लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने घेतलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसमधूनच विरोध होत असताना भाजपकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर शरसंधान करण्यात आले आहे. २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचे विधेयक मंजूर करून घेतले. त्या पद्धतीचे समर्थन करणाऱ्या पटोले यांनी आठवडाभरातच आणखी दोन नव्या भूमिका मांडल्या असल्याने ते खरोखरच गोंधळात सापडले आहेत, हे स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी केले.
डिसेंबर २०१९ च्या अधिवेशनात पटोले यांनी एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचे समर्थन केले होते. तर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत राज्य शासनाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होते; परंतु मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर झाल्यावर पटोले यांनी परत भूमिका बदलली व आता तीन नव्हे तर दोन सदस्यीय प्रभागपद्धती असावी, असा सूर लावला आहे. एकूणच ते गोंधळल्याचे दिसून येत असून काँग्रेसची नेमकी स्वत:ची कायम भूमिका नाही. काँग्रेसला मुळात मनपा निवडणुकांना सामोरेच जायचे नाही, असा आरोप खोपडे यांनी लावला.