सीबीआयवरून काँग्रेसने मोदींना घेरले : नागपुरात सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:16 PM2018-10-26T23:16:48+5:302018-10-26T23:18:53+5:30
राफेल घोटाळ्याची चौकशी करू नये म्हणून सीबीआय संचालक अलोक वर्मा व राकेश अस्थाना यांना मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, असा आरोप करीत शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी सेमिनरी हिल्सवरील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राफेल घोटाळ्याची चौकशी करू नये म्हणून सीबीआय संचालक अलोक वर्मा व राकेश अस्थाना यांना मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, असा आरोप करीत शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी सेमिनरी हिल्सवरील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी केली. मोदी सरकारच्या काळात देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. स्वायत्त संस्था मोडित काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीबीआयमधील सध्याच्या घडामोडी त्याचेच एक उदाहरण आहे. एक-दोन नव्हे तर अनेकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार सरकार करीत आहे, असा आरोप या वेळी विकास ठाकरे यांनी केला.
आंदोलनातकाँग्रेसचे प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, प्रवक्ता अतुल लोढे, युवा नेता अॅड.अभिजित वंजारी, प्रवक्ते विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, माजी महापौर नरेश गावंडे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक अध्यक्ष तौसीफ खान, डॉ.गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, बंडोपंत टेंभुर्णे, दीपक वानखेडे, रमेश पुणेकर, संदीप सहारे, हरीश ग्वालवंशी, प्रवीण गवरे, स्नेहा निकोसे, विवेक निकोसे, भावना लोणारे, युगल विदावत, त्रिशरण सहारे, दर्शनी धवड, उज्ज्वला बनकर, प्रवीणचंद सडमाके, सुखदेव शीव, युवराज शीव प्रामुख्याने उपस्थित होते. किरण गडकरी, आकाश तायवाडे, संजय मांगे, जगदीश गमे, केतन ठाकरे, बॉबी धोटे, आशा शेंदरे, सुनिता ढोले आदींनी भाग घेतला.