पूर्व व दक्षिण नागपूर बचावसाठी काँग्रसचे पथक दुसऱ्यांदा दिल्लीत
By कमलेश वानखेडे | Updated: October 25, 2024 18:39 IST2024-10-25T18:37:10+5:302024-10-25T18:39:18+5:30
Amravati : विकास ठाकरे, अभिजित वंजारी आदींनी घेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी

Congress team in Delhi for the second time to defend East and South nagpur
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपूर तसेच दक्षिण नागपूर काँग्रेसकडेच कायम ठेवावे, या मागणीसाठी शहरातील काँग्रेस नेत्यांचे पथक शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. आम्ही मित्रपक्षांचा सन्मान करतो पण वास्तविकता पाहून निर्णय घ्या, नागपूर शहरातील काँग्रेसच्या जागा कमी करू नका, अशी विनंती ज्येष्ठ नेत्यांना भेटून करण्यात आली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यासह आ. अभिजित वंजारी, उमाकांत अग्नीहोत्री, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, प्रसन्ना तिडके, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, ॲड. आसिफ कुरेशी आदींनी दिल्ली गाठली. सर्वप्रथम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व के.सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. या भेटीत दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसच्या कोट्यात सुटली असल्याचे समजत आहे, पण कुठल्याही परिस्थतीत यात बदल होऊ देऊ नका, अशी विनंती नेत्यांना करण्यात आली. पूर्व नागपूरबाबत २०१४ व २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी मांडण्यात आली. २०१४ मध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढली असता दखलपात्र मते मिळाली नाहीत. २०१९ मध्ये काँग्रेसने येथे ८० हजारावर मते घेतली आहेत. त्यामुळे ही जागा यावेळीही काँग्रेसला लढू द्यावी, अशी विनंती करण्यात आली. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यापासून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत की काँग्रेस हायकमांडकडे एबी फॉर्म मागा व पक्षाचा उमेदवार लढवा. आम्हाला भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांना पराभूत करायचे आहे, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचेही सांगण्यात आले.
या भेटीत काँग्रेस नेत्यांनी दक्षिणची जागा काँग्रेसच लढेल, असे स्पष्ट केले. तर पूर्व नागपूरबाबत आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू, असे आश्वस्त केल्याचा दावा दिल्ली गाठणाऱ्या काँग्रेसच्या पथकाने केला आहे.