राष्ट्रपती राजवटीबद्दल काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार - नाना पटोले
By कमलेश वानखेडे | Published: July 13, 2023 06:17 PM2023-07-13T18:17:37+5:302023-07-13T18:18:40+5:30
भाजपने महाराष्ट्राला कलंक लावल्याची टीका
नागपूर : महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची नियुक्ती झाली मात्र खाते वाटपामध्ये कोणाला कोणते खाते मिळणार यावर चर्चा सुरू आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राष्ट्रपती व राज्यपाल यांनी यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. भीती दाखवून विरोधकांना दाबण्याची भीती सरकार दाखवत आहे. यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. एकूणच परिस्थीती पाहता भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन देऊन केली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, जनतेला कुणाकडे कोणते खाते आहे याचे काही देणेघेणे नाही. हे जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. अनेक भागात पेरणे झाले नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली टीम करून कृषी केंद्रावर आपलाच अधिकारी पाठवायचे व लुटायचे, असे सुरू आहे. वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. एक मंत्री सहा सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री राहत असेल तर शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
काँग्रेस विरोधीपक्ष नेत्याबाबत अध्यक्षांना पत्र देईल
- ज्याचे संख्याबळ जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. ही एक पद्धत आहे. दोन्ही सभागृहात ते संख्याबळ काँग्रेसजवळ आहे. यात मतदान होत नाही. विधानसभा अध्यक्षांना घोषणा करावी लागते. आता काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यायचा आहे. १७ जुलैला अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवशी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदाचे पत्र अध्यक्ष व सभापतींना दिले जाईल. हायकमांडकडून निश्चित होणाऱ्या आमदाराचे नाव दिले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या ३० जागांवर फोकस
- राज्यातील लोकसभेच्या ३० जागांवर फोकस केला आहे. त्यांची ए, बी अशी कॅटेगरी केली आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलवून त्यांच्याकडून लोकसभेच्या तयारीची माहिती घेतली. कोर कमिटीच्या चार-पाच मीटिंग झाल्या. नवीन लोकांची नेमणूक करून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
मुंडे भगिनी अनुपस्थित, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न
- भाजपच्या मुंबईतील बैठकीला मुंडे भगिनी अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले असता हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे पटोले म्हणाले. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा म्हणजे त्यांच्या काय भावना आहेत हे समजून येईल. भाजपचे नेते उद्या काँग्रेसमध्ये गेले, असे खडसे बोलले होते. हा त्यांचा इशारा सूचक होता. मी दावा करणार नाही, पण वेळेवर सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.