नागपूर: केंद्र सरकारने अग्नीपथ योजना आणली. मात्र ही योजना लागू करण्यापूर्वी सैन्याचत नियमित भरतीसाठी शारिरीक चाचणी उत्तीर्ण केलेल्या सुमारे दीड लाख युवकांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या युवकांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे देशभरात ‘जय जवान’ अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. विनित पुनिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाते. मात्र, चार वर्षानंतर काय या चिंतेने युवक तनमनाने ही सेवा करतील, यात शंका आहे. अग्नीवीर शहीद झाले तर त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही. सैनिकाला निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन यांना लागू नाही. ही योजना सैन्य विरोधी आहे. माजी सैनिकही या योजनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच सैन्याची भरती व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जय जवान’ अभियानांतर्गत फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ते ‘ न्याय पत्र’ घेऊन ३० लाख कुटुंबांशी संपर्क साधतील. यानंतर ५ ते १० मार्च दरम्यान प्रत्येक शहरातील शहीद चौकात धरणे दिले जातील. १७ ते २० मार्च दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘न्याय यात्रा’ काढली जाईल व या अंतर्गत ५० किलोमीटर पदयात्रा केली जाईल. बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस ही लढाई लढत असल्याचे डॉ. पुनिया यांनी सांगितले. ‘न्याय पत्र’चे प्रकाशन‘जय जवान’ अभियानांतर्गत ३० लाख कुटुंना वितरित करण्यात येणाऱ्या ‘न्याय पत्र’चे यावेळी डॉ. विनित पुनिया यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, नंदा पराते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.