नागपूर : गटबाजीची शिकार झालेल्या नागपूर शहर कॉंग्रेसमध्ये अनेक दिवसांनंतर पुन्हा एकजूट दिसली. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतासाठी विमानतळावर प्रत्येक गटातील नेता आणि कार्यकर्त्याने हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. वर्धा रोडवर होर्डिंग लावून कॉंग्रेसने शक्तिप्रदर्शनही केले.
सकाळी १०.३० वाजतापासूनच कॉंग़्रेस कार्यकर्ते विमानतळावर गोळा झाले. अनेकांच्या हातात स्वागताचे फलक होते. ढोलताशांच्या गजरात पक्षाचा झेंडा घेऊन कार्यकर्ते आनंदाने नाचले. विमानतळावर पटोलेंच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. अभिजीत वंजारी, आ. राजू पारवे, नाना गावंडे, डॉ. बबनराव तायवाडे आदी उपस्थित होते. पटोले विमानतळाच्या गेटबाहेर निघताच कार्यकर्त्यांचा जोश पुन्हा वाढला. खुल्या जीपमध्ये स्वार होऊन नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा आणि प्रेमाचा स्वीकार केला.
या दरम्यान अतुल लोंढे, राहुल पुगलिया, बंटी शेळके, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव, तक्षशीला वाघधरे, प्रज्ञा बडवाईक, शेख हुसेन, संजय महाकाळकर, नरेंद्र जिचकार, रवींद्र दरेकर, प्रशांत धवड, पुरुषोत्तम हजारे, उमेश डांगे, जुल्फिकार भुट्टो, विवेक निकोसे, इरशाद अली, त्रिशरण सहारे, संदीप सहारे, राजा तिडके आदी उपस्थित होते.
अनेकांचे खिसे कापले
स्वागतादरम्यान झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन गर्दीत घुसलेल्या खिसेकापूंनी हात साफ केला. अनेकांचे खिसे कापले गेले. पैशाची पाकिटे, मोबाईल या सारख्या वस्तू चोरीस गेल्या. गर्दी एवढी होती की अनेक प्रवाशांना आपले लगेज सोबत घेऊन आत जाताना आणि बाहेर निघताना अडचण होत होती.
दोन्ही महिला अध्यक्ष नाराज
- महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तक्षशीला वाघधरे यांना पटोले यांच्या स्वागतासाठी विमानतळाच्या आत प्रवेश मिळाला नाही. याबाबत या दोन्ही महिला नेत्यांनी प्रदेशध्यक्ष पटोले यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पक्ष वाढवायला महिला कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली जाते. मात्र, स्वागत सोहळ्यात त्यांनाच डावलले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.