नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट करण्यासाठी भाजपने भरपूर जोर लावला. काँग्रेसमधील तीन सदस्यांनी बंडखोरी केली. भाजपने सभागृहात आपले उमेदवार मागे घेत बंडखोरांना साथ दिली. मात्र, त्यानंतरही काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत आखलेली रणनीती व उर्वरित काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षाशी राखलेले इमान यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेसच्या पाटणसावंगी सर्कलच्या मुक्ता कोकड्डे या ३९ मते मिळवत अध्यक्षपदी, तर गोधनी सर्कलच्या कुंदा राऊत या ३८ मते मिळवून उपाध्यक्षपदी विजयी झाल्या; तर अकाेला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व राखत विजय मिळविला. अध्यक्षपदी संगीता अढाऊ व उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी झाले.
नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर सोमवारी पडदा पडला. अंबिका फार्मवर मुक्कामी असलेले काँग्रेसचे सदस्य सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेत पोहोचले. काँग्रेसकडून अध्यक्षासाठी मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्षासाठी कुंदा राऊत यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सुरुवातीपासूनच वेगळी चूल मांडणारे काँग्रेसचे कोराडी सर्कलचे सदस्य नाना कंभाले यांनी दोन सदस्यांच्या बळावर बंडखोरी करीत प्रीतम कवरे यांचा अध्यक्षपदासाठी, तर उपाध्यक्षपदासाठी स्वत: चा अर्ज सादर केला. त्यानंतर भाजपकडून नीता वलके यांचा अध्यक्षासाठी व कैलास बरबटे यांचा उपाध्यक्षासाठी अर्ज दाखल झाला. तीननंतर जि.प.च्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात होते.
सभागृहात पोहोचल्यानंतर भाजपने आपल्या दोन्ही सदस्यांचे अर्ज मागे घेतले व काँग्रेसचे बंडखोर प्रीतम कवरे व नाना कंभाले यांना समर्थन दिले. अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात मुक्ता कोकड्डे यांना काँग्रेसच्या २८, राष्ट्रवादीच्या ८, शेकाप १, गोगपा १ व एका अपक्ष अशा ३९ सदस्यांनी मतदान केले. बंडखोर प्रीतम कवरे यांना भाजपच्या १४, काँग्रेसच्या बंडखोरांचे ३ व शिवसेनेच्या १ अशा १८ सदस्यांनी मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात कुंदा राऊत यांना काँग्रेसच्या २८, राष्ट्रवादीच्या ७, शेकाप १, गोगपा १ व एका अपक्ष अशा ३८ सदस्यांनी मतदान केले; तर नाना कंभाले यांना भाजपच्या १४, बंडखोरांच्या ३, शिवसेनेच्या १ व राष्ट्रवादीच्या १ अशा १९ सदस्यांनी मतदान केले.
सभागृहात ‘५० खोके, एकदम ओके’ च्या घोषणा...
नागपूर जि. प. सभागृहात मतदानाची प्रक्रिया पडताच काँग्रेसच्या सदस्यांनी बंडखोरांना उद्देशून ‘५० खोके, एकदम ओके’ च्या घोषणा देत जोरदार नारेबाजी केली. यानंतर नवनियुक्त अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संधीचे सोने करेल
- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण निघाले होते. आमचे नेते सुनील केदार यांनी या पदासाठी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची निवड केली. मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करेल.
- मुक्ता कोकड्डे, नवनिर्वाचित अध्यक्ष, जि. प., नागपूर
अकाेला जिल्हा परिषदेत ‘वंचित’चेच फटाके; महाविकास आघाडीचा फज्जा!
अकोला : अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये विद्यमान सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या संगीता अढाऊ यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांनी विजय मिळविला. दोन्ही पदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’च्या संगीता अढाऊ यांना २५ व महाविकास आघाडीच्या किरण अवताडे मोहोड यांना २३ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'वंचित'चे सुनील फाटकर यांना २५ आणि महाविकास आघाडीचे अपक्ष व विद्यमान सभापती सम्राट डोंगरदिवे यांना २३ मते मिळाली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत दोन्ही पदांवर विजय मिळवित सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेतील वर्चस्व कायम राखले असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष आणि दोन अपक्ष मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, नायब तहसीलदार अजय तेलगोटे, नीलेश सांगळे यांनी सहकार्य केले.