कमलेश वानखेडे, नागपूर : मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला. आता तेच राजा होण्याचे स्वप्न पाहत आहे. ज्यांनी राजा केला त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवत आहे. जनता हे सहन करणार नाही, कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधानांच्या कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. लोक त्यांना ऐकायला जातील पण मतदान करणार नाहीत. एकनाथ खडसे यांच्या गळ्याला फास लागला आहे. या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका खडसे यांनी घेतली असावी, असे वडेट्टीवार म्हणाले.
सांगलीबाबत टोकाची भूमिका घेऊन नये, मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यानी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी. खा. नवनीत राणा या शरद पवार सारख्या जेष्ठ नेत्याचा आशिर्वाद व काँग्रेसच्या मतांमुळे निवडून आल्या होत्या. आता त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. संजय निरुपम यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकले आहे. ते कुठे जातात याच्याशी आता काँग्रेसला काही देणेघेणे नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
भाजपमध्ये एकमेकांचा काटा काढणे सुरू
काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती. आता काँग्रेस एकसंघ आहे. ही कीड आता भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतेय. घुशीला बोक्या व्हावे, बोक्याला वाटते की मी त्यापेक्षा चपळ प्राणी व्हावं. राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच. भाजपमध्ये महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काटा काढण्यासाठी दाबन वापरतात की सुई हे येत्या काही दिवसात कळेल, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी घेतला.