नागपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी १२ राज्यांत निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये कुठेच काँग्रेस येऊ नये म्हणजे लोकसभेची निवडणूक सोपी होईल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँग्रेस जनमानसात जाऊन काम करीलच; पण भाजपकडून होणाऱ्या अपप्रचाराला रोखण्यासाठी सोशल मीडियावरही टक्कर द्यावी लागेल. त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने राष्ट्रीय नवसंकल्प शिबिराचा रविवारी समारोप झाला. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, अ.भा. काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, प्रवक्ते पवन खेरा, सोशल मीडिया विभाग प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया वॉर स्थापन करून सोशल मीडिया विभागाचा विस्तार करण्याचा संकल्प नाना पटोले यांनी केला, तर सोशल मीडिया हे भाषण देण्याचे व्यासपीठ नसून आपसातील मतभेद विसरून एकजूट लढा देण्याचा मनोदय यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. देशात विविध समुदायांमध्ये फूट पाडणाऱ्या अराजक शक्तीला पायबंद घालण्यासाठी आमचे सोशल मीडिया सेल सक्षम असल्याचे पवन खेरा म्हणाले. तळागाळापर्यंत सोशल मीडियाचे महत्त्व पटवून देण्याची गरज रोहन गुप्ता यांनी व्यक्त केली. सत्याच्या लढ्यासाठी सर्वांची तुरुंगात जाण्याची तयारी असली पाहिजे, असे अलका लांबा म्हणाल्या.
शिबिराला राष्ट्रीय स्वयंसेवक हसिबा अमीन, नितीन अग्रवाल, रुचिरा चतुर्वेदी, विजयानंद पोल, ज्ञानेश्वर चव्हाण, बिलाल अहमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.