विजय वडेट्टीवार : शिस्त न पाळल्यास कारवाईनागपूर : विदर्भ काँग्रेस निर्माण होईल, अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी केलेले नाही. महापालिका निवडणूक पक्षाच्या ‘पंजा’ चिन्हावरच लढली जाणार आहे. कार्यकारिणी संदर्भात काही नाराजी असेल, काही नावे सुटली असतील तर ती समाविष्ट करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिले होते. असे असतानाही कुणी पक्षशिस्तीचा भंग करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले नागपूरचे पालक व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.महापालिकेत गेल्या दहा वर्षात भाजपची सत्ता शहरातील नागरिकांनी अनुभवली आहे. या काळात शहराचा किती विकास झाला, याची सर्वांनाच जाणीव आहे. नागरिकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. ज्या प्रभागात उमेदवारीत स्पर्धा नाही, अशा प्रभागातील उमेदवारांची नावे लकरच निश्चित केली जातील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडून विदर्भ काँग्रेस स्वतंत्र लढणार, निवडणुकीत पंजा गोठविण्यात येणार अशा चर्चा पसरविल्या जात आहेत. काँग्रेसच्या कोणत्याही जबाबदार नेत्याने अशा आशयाचे वक्तव्य केलेले नाही वा प्रसिद्धीसाठी लेखी दिलेले नाही. काँग्रेस निवडणूक पंजावरच लढणार आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात महापालिकेतील भाजपने जनतेची लूट केली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता येऊ नये म्हणून फूट पडल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. कोणत्याही नेत्याने पक्ष कमकुवत करणाऱ्या बातम्या पसरविताना आपल्या नावानिशी देण्याची हिंमत दाखवावी, असेही ते म्हणाले. शहर कार्यकारिणी तयार करण्यापूर्वी नेत्यांनी सुचविलेल्या नावांची यादी प्रदेश समितीकडे पाठविली होती. पक्षाच्या बैठका झाल्या. मात्र, पद मिळूनही पक्षाच्या कामात स्वारस्य नसेल तर त्यांच्याजागी दुसऱ्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार संधी दिली जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन सुरू आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे आयोजित केले जाणार आहेत. १९ नोव्हेंबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उमाकांत अग्निहोत्री, अॅड. अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, देवा उसरे, संजय सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेस पंजावरच लढणार
By admin | Published: November 06, 2016 2:13 AM