-
नागपूर : वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेला ग्राहक व जीएसटीच्या आकारणीमुळे मेटाकुटीस आलेला व्यापारी यांच्या नाराजीला खतपाणी घालत त्यांना बोलते करण्यासाठी आता काँग्रेस ‘महागाईवर चर्चा’ हे आंदोलन करणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठांमध्ये काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आधी शहरातील बाजारपेठांना भेटी देतील. तेथील व्यापारी व ग्राहकांची मते जाणून घेतील. त्यानंतर एक निश्चित दिवस ठरवून त्या बाजारपेठेत आंदोलन केले जाईल. ‘महागाई वर चर्चा’ या आंदोलनात व्यापारी व ग्राहकांना त्यांची मते मांडण्याची संधी दिली जाईल. यासोबत काँग्रेस नेतेही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रकाश टाकतील. महागाईने त्रस्त असलेला ग्राहक व व्यवसायावर परिणाम झालेला व्यापारी यांना जोडण्यासाठी काँग्रेस हा उपक्रम राबविणार आहे. यानंतर २८ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर महागाईवर हल्लाबोल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी फोडणार महागाईची दहीहंडी
- केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे. त्यामुळे प्रत्येकच वस्तू महागणार आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस याचेही दर वाढत आहे. केंद्र सरकार महागाईचा थरावर थर रचत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी सायंकाळी ५ वाजता हिवरीनगर येथे महागाईची दहीहंडी फोडली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी स्पष्ट केले.