जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेस करणार एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:48 AM2019-01-08T00:48:53+5:302019-01-08T00:51:20+5:30
तीन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १० जानेवारी रोजी नागपुरातून निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान पूर्व विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा व विधानसभा क्षेत्रात काँग्रेस नेते जाणार आहेत. समारोपप्रसंगी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १० जानेवारी रोजी नागपुरातून निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान पूर्व विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा व विधानसभा क्षेत्रात काँग्रेस नेते जाणार आहेत. समारोपप्रसंगी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नियोजित वेळापत्रकानुसार ८ जानेवारी रोजी जनसंघर्ष यात्रा निघणार होती, मात्र यात्रा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. १० जानेवारीला दीक्षाभूमी, ताजबाग, गणेश टेकडी या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे. त्यानंतर कामठी, रामटेक येथे पोहोचेल. तुमसर, तिरोडा, गोंदिया, सडकअर्जुनी, साकोली, भंडारा, चिमूर, वरोरा, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी व परत नागपूर, असा सभेचा मार्ग असेल. प्रत्येक मुख्य ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची सभा होणार आहे. एकूण १० ठिकाणी सभेचे नियोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारीला या यात्रेचा समारोप होणार आहे. मतदारसंघात जाहीर सभा होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला असून, या तीनही राज्यांतील मुख्यमंत्री समारोपप्रसंगी यावेत, असे पक्षाचे प्रयत्न आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समारोपाची विशेष सभा २० जानेवारी रोजी आयोजित होण्याची शक्यता आहे.