काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:25 AM2018-12-29T01:25:27+5:302018-12-29T01:26:24+5:30
कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.
नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे शुक्रवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेसचा १३४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष विकास ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, उपाध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, माजी विश्वस्त अनंत घारड, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, अॅड.अभिजित वंजारी, माजी महापौर नरेश गावंडे, माजी आ. यशवंत बाजीराव, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, जयंत लुटे, संदेश सिंगलकर,नंदा पराते,रमेश पुणेकर, नितीश ग्वालवंशी,रामगोविंद खोब्रागडे, विवेक निकोसे, पंकज लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णरावजी पांडव यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सुमारे ७० कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला तीन राज्यांचे मुख्यमंत्री येणार
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा ८ जानेवारी रोजी दीक्षाभूमी, ताजबाग, गणेश टेकडी येथे दर्शन करून सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करुन रामटेक येथे जाहीर सभा होईल. १२ जानेवारी रोजी यात्रा नागपुरात दाखल होईल. १३ जानेवारी रोजी नागपुरात संघटनात्मक बैठक होईल. तीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अ.भा. काँग्रेस कमिटीचे नेते सहभागी होतील. या नेत्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल.