जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल
By कमलेश वानखेडे | Published: August 5, 2022 12:29 PM2022-08-05T12:29:03+5:302022-08-05T12:56:03+5:30
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅरिकेट्सवरून उडी
नागपूर : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावली लावून आधीच वाढलेल्या महागाईत आणखी भर घातली आहे. सर्वसामान्य माणसाला दोन वेळचे जेवण मिळवणे ही कठीण झाले आहे, असा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करीत निदर्शने केली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रोखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी बॅरिकेटिंग केले होते. कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेट हटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांची पोलिसांशी झटापट झाली.
देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. बेरोजगारी महागाई यासारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखवून चूप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेवार, गिरीश पांडव, संजय म्हाकलकर, प्रशांत धवड, महिला काँग्रेसचे अध्यक्ष नॅश अली, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत, आकाश तायवाडे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी बॅरिकेटवर चढून आतमध्ये उड्या घेतल्या त्यामुळे पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले.