नागपूर : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकले असून वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना ताब्यात घेतले असून आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. राहुल गांधींची सुटका होईपर्यंत आम्ही हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.
राहुल गांधी यांना नोटीस पाठवून भाजप घाबरली आहे, हे सिद्ध झाले आहे. आता संघर्षाची सुरुवात झाली असून यांना सत्तेतून खाली घेतल्याशिवाय थांबणार नाही, अशी जोरदार टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. तर, आता आम्ही रस्त्यावर उतरले आहोत अटक झाली तरी थांबणार नाही, घाबरणार नाही, असा इशारा उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. ईडी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त असून पोलीस ॲक्शनमध्ये आले आहेत. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावला. याच्या निषेधार्थ नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर कूच केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी कार्यालयाचे गेट बंद केले असता नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच वातावरण चिघळले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेता पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली. यावेळी नेते पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव यांना ताब्यात घेण्यात आले असून वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, 'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना ८ जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे.