विधानसभेसाठी काँग्रेस लागणार कामाला : लोकसभेच्या पराभवावर गुरुवारी मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:08 PM2019-06-12T23:08:27+5:302019-06-12T23:09:40+5:30
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात होत असून तीत लोकसभेच्या पराभवावर मंथन तर विधानसभेच्या तयारीवर चर्चा केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात होत असून तीत लोकसभेच्या पराभवावर मंथन तर विधानसभेच्या तयारीवर चर्चा केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ४० हजार मते वाढली आहेत. देशभरात झालेले काँग्रेसचे पानीपत पाहता नागपुरातील पराभव तुलनेत तेवढा मोठा नाही, असा दावा काँग्रेसजनांकडून केला जात आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसची पहिल्यांदाच बैठक होत असून तीत लोकसभेतील मतदानाचा बूथनिहाय आढावा घेतला जाणार आहे. लोकसभेत शहरातील मोजकेच बूथ वगळता उर्वरित सर्वच बूथवर भाजपला मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली. काही बूथवर तर काँग्रेसला अपेक्षेच्या ५० टक्केही मते मिळाली नाहीत. यामुळे नेत्यांची चिंता वाढली आहे. बूथवरील मतदानाची आकडेवारी व अशी परिस्थिती का ओढवली याचे अहवाल ब्लॉक अध्यक्षांकडून मागविण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता बूथनिहाय आढावा घेऊन संघटन अधिक मजबूत करण्यावर काँग्रेसतर्फे भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे बूथ प्रमुख बदलण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाचे विविध सेल व अध्यक्षांची पुनर्बांधणी करणे, रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, सदस्य नोंदणी अभियान राबविण्यावर चर्चा केली जाणार आहे.
बूथ मॅनेजमेंटवर भर
शहर काँग्रेसतर्फे शहरातील सर्व बूथचे ए,बी व सी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात यातील बी व सी गटातील बूथवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी बूथ प्रमुख व सदस्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येईल. निष्क्रिय बूथ अध्यक्षांना बदलण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. यावर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.