कुणाला मिळणार स्वीकृती : ठाकरे व जिचकार दोघांचेही अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित माजी मंत्री चुतुर्वेदी-राऊत-अहमद गटातील किशोर जिचकार यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांनी स्वीकृ त सदस्यांसाठी दावा केला आहे. पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. या वादात स्वीकृत सदस्यांची संधी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकास ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अश्वीन मुद्गल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर तर अनुमोदक म्हणून रमेश पुणेकर यांनी स्वाक्षरी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताता अॅड. अभिजित वंजारी उपस्थित होते. तर किशोर जिचकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरसेवक तानाजी वनवे, प्रफु ल्ल गुडधे व संजय दुबे आदी उपस्थित होते. स्वीकृत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नियमानुसार त्यावर गटनेत्यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. महाकाळकर यांनी विकास ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली आहे. शुक्रवारी आयुक्त प्राप्त अर्जासोबतच्या कागदपत्रांची छाननी करतील. नियनानुसार त्रुटी असलेला यातील एक अर्ज बाद ठरविला जाईल.
काँग्रेसमध्ये घमासान
By admin | Published: May 19, 2017 2:37 AM