नागपूर : विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे अॅड.श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच खलबते सुरू झाली आहेत. विधिमंडळात श्रीहरी अणे यांच्याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला होता. परंतु विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांनी मात्र अॅड.अणे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यामुळे एकाच मुद्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन भूमिका निर्माण झाल्या आहेत.वेगळ््या विदर्भाचे काँग्रेसने समर्थन केले नव्हते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा तापला होता. अॅड.अणे यांनी अगोदर स्वतंत्र विदर्भ व आता वेगळ््या मराठवाड्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसने विधिमंडळात जोरदार निषेध केला. काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी तर पार मुंडके तोडण्याची भाषा केली.एकीकडे राज्यात काँग्रेसकडून अणे यांचा विरोध होत असताना विदर्भातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मात्र ‘अणे’ राग आवळला आहे. अणे यांनी राजीनामा दिला असला तरी सर्व विदर्भवादी त्यांच्या पाठीशी असल्याचे वक्तव्य नेत्यांकडून देण्यात आले आहे. इतकेच काय पण विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यासंदर्भात काँग्रेसच्या माजी शासनकर्त्यांवर टीकादेखील करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांनीदेखील गोपनीयतेच्या अटीवर अॅड.अणे यांचे समर्थन केले आहे. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी जाहीरपणे अॅड.अणे यांचे समर्थन केले आहे. वेगळ््या राज्याची मागणी करण्याचे अणे यांना स्वातंत्र्य आहे. अणे यांची एकट्याची ही लढाई नसून विदर्भ, मराठवाड्याची आहे. गेल्या सहा दशकात राज्यकर्त्यांनी विदर्भाला कधी झुकते माप दिले नाही व मराठवाड्याचीदेखील दखल घेतली नाही. विदर्भ विकासासाठी केलेल्या नागपूर करारातील एकाही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. विदर्भवादी त्यांच्या पाठीशी असून त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्यांना भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी सणसणीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीदेखील विदर्भाच्या मुद्यावर अॅड.अणे यांचे समर्थन केले आहे. श्रीहरी अणे हे अगोदरपासूनच विदर्भवादी आहेत. जर विदर्भाबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आक्षेप घेत राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला असेल तर ते योग्य नाही, असे मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अणे यांनी विदर्भाबाबत दिलेल्या वक्तव्याचा माणिकरावांनीच विधानपरिषदेत निषेध केला होता.(प्रतिनिधी)अणे यांच्यावर अन्याय केलाश्रीहरी अणे यांनी नेहमीच विदर्भाची भूमिका मांडली आहे. विदर्भातील जनतेचीही हीच भावना आहे. भाजपने विदर्भातील जनतेला धोका दिला आहे. शिवसेनेच्या दबावात भाजपने अणे यांच्यावर महाधिवक्ते पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला. हा निर्णय दुर्दैवी असून अणे यांच्यावर अन्याय करणार आहे. - सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री
वैदर्भीय काँग्रेसी अणेंसोबत
By admin | Published: March 23, 2016 2:52 AM