नागपूर : केंद्र सरकारने पेटोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे गुरुवारी सायकल रॅली काढली जाणार आहे. संविधान चौकातून सकाळी ११ वाजता रॅली निघून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देईल. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आंदोलनाचे नेतृत्व करणार असून त्यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्ते सायकल चालवून निषेध नोदवतील.
आंदोलनात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ग्रामीण अध्यक्ष राजेद्र मुळक, आ. अभिजीत वंजारी, आ. राजू पारवे यांच्यासह प्रदेश व शहर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतील. केंद्रातील नरेद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही उलट कर रूपाने कोट्यवधी रुपयांची लूट चालवली आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.