अभिजित वंजारी यांचा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी दावा
By कमलेश वानखेडे | Published: July 12, 2023 01:56 PM2023-07-12T13:56:07+5:302023-07-12T13:58:11+5:30
महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना केली पत्राद्वारे विनंती
नागपूर : काँग्रेसकडूननागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे युवा आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तेली समाजाला मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपदी आपल्याला संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र पाठवून केली आहे.
आ.वंजारी यांनी पत्रात म्हटले आहे की, मी डिसेंबर २०२० मध्ये विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला ही प्रतिष्ठेची जागा जिंकता आली. २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेली जाती समाजाला मंत्रीपद दिले गेले नाही. तेली समाज हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समाज आहे. दुसरीकडे भाजपने प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध स्तरावर तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे.
अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले
आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने विधानपरिषदेत काँग्रेस हा विरोधी पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मी एक चांगला वक्ता असून विधानपरिषदेचा अडीच वर्षांच्या अल्प कालावधीत मी १२५ पेक्षा जास्त वेळा सभागृहातील चर्चेत भाग घेतला आहे. प्रश्न मांडले आहेत. काँग्रेसचा कट्टर समर्थक म्हणून मला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी पत्राद्वारे केली आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे काँग्रेसला बळ
- विधान सभेतील आमदारांपाठोपाठ विधान परिषदेतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्येही फूट पडली आहे. उपसभापती निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विपलव बाजोरिया यांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ८ वर आले आहे. तर राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, विक्रम काळे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण अनिकेत तटकरे हे अजित पवार गटात सामील झाल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार) संखाबळ ४ वर आले आहे. काँग्रेसचे ९ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या मागणीला बळ मिळाले आहे. १७ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापूर्वी या विषयावर मार्ग निघाला, अशी काँग्रेसची भूमिका आहे.