नागपुरात पाण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल : नारेबाजी, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 09:56 PM2019-07-22T21:56:21+5:302019-07-22T21:57:27+5:30
एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणि यातच दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलामुळे नागरिक संतापले आहेत. पाण्यावरून सोमवारी काँग्रेसने महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणि यातच दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलामुळे नागरिक संतापले आहेत. पाण्यावरून सोमवारी काँग्रेसने महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
गेल्या आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रासले आहेत. यातच शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात पाणी येत नाही. मात्र, अवाजवी पाण्याची देयके पाठवून नागरिकांना दुहेरी मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच मडके फोडत रोष व्यक्त केला. आयुक्तालयात नारेबाजी केली.
यानंतर प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन शहरातील पाणी समस्येवर चर्चा करीत संताप व्यक्त केला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नगर अभियंता मनोज तालेवार, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ओसीडब्ल्यूचे केएनपी सिंग आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नगरसेवक व नागरिकांनी अधिकाºयांना धारेवर धरले. पाणी मागणाºयांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा निषेध नोंदविला. पाण्यासाठी आंदोलन करणाºयांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, अशी मागणी यावेळी लावून धरली. तातडीने उपाययोजना न झाल्यास कार्यालयाला टाळे लावण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे या आंदोलनात गैरहजर असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर वनवे यांनी मात्र कौटुंबिक कारणामुळे आंदोलनस्थळी येऊ न शकल्याचे स्पष्ट केले.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात विशाल मुत्तेमवार, अॅड. अभिजित वंजारी, नगरसेवक रमेश पुणेकर, बंटी शेळके, संदीप सहारे, संजय महाकाळकर, मनोज सांगोळे, हरीश ग्वालवन्शी, नगरसेविका उज्ज्वला बनकर, हर्षला सांबळे, साक्षी राऊत, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे, माजी नगरसेवक प्रशांत धवड, रमण पैगवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग होता.