‘सेवाग्राम’साठी काँग्रेसचे मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:00 AM2018-10-01T11:00:51+5:302018-10-01T11:02:50+5:30
७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसजन महात्मा गांधी यांच्या विचारसरणीला बांधलेले आहते. त्यामुळे निघणारा शांती मार्चकरिता शांततेने मार्च व्हावा. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर्व काँग्रेसजन एकत्रित येणार आहेत. गांधी जयंती ऐतिहासिक दिवस असून, ७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली.
२ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम येथे आयोजित कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर देवडिया काँग्रेस भवन येथे अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी खासदार विलास मुत्तेमवार, अ.भा. किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी आमदार सुभाष धोटे, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, पूर्व अध्यक्ष शेख हुसेन, मुजीब पठाण, शकूर नागाणी, यशवंत बाजीराव, डॉ. अविनाश वारजूरकर, बंडू सावरबांधे, भंडारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम सागर गणवीर, अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गिरीश पांडव, शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, सरचिटणीस जयंत लुटे, रमण पैगवार, प्रवक्ता व सरचिटणीस संदेश सिंगलकर, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, महिला सचिव रिचा जैन, कुंदा राऊ त, तक्षशीला वागधरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सेवाग्रामला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आगमन होईल. येथून ते सेवाग्रामला जातील. बापुकुटी येथे संपूर्ण अ.भा. काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रार्थना करतील. कार्यक्रमात महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. हा कार्यक्रम शांततेत व्हावा, असे अशोक चव्हाण म्हणाले. राहुल गांधी यांची पदयात्रा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेपासून दुपारी १ ते १.३० च्या सुमारास सुरू होऊन दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास सर्कस मैदानात जाईल. येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
व्हेरायटी चौकात आदरांजली कार्यक्रम
२ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सर्वप्रथम सकाळी ८ वाजता व्हेरायटी चौक येथे गांधीजींना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता नागपुरातील सर्व पदाधिकारी, कार्यक र्ते सेवाग्रामसाठी रवाना होतील, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली. ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, पराभूत उमेदवार, विविध सेलचे अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस शहर पदाधिकारी यांनी आपापल्या ब्लॉकमधून ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोठ्या संख्येने सेवाग्राम येथे रॅलीमध्ये समावेश करण्यासाठी निर्देश दिले. नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीचे १० ते १५ हजार कार्यकर्ते सामील होतील, असे बैठकीत सांगण्यात आले.
मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखल
काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते व प्रदेश काँग्रेसचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे रविवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी वर्धेच्या सभेसाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून किती कार्यकर्ते जाणार आहेत याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे सोमवारी सकाळच्या सुमारास सेवाग्रामला जाणार असून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
जिल्हा अध्यक्षांची बैठक
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विदर्भातील सर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची स्वतंत्र आढावा बैठक काँगे्रस कमिटीच्या मुख्य कार्यालयात घेतली. यावेळी जिल्हानिहाय तयारीचा आढावा घेण्यात आला.