लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस पक्षाच्या १३५ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेसतर्फे देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्याहस्ते पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला.फ्लॅगमार्च गांधीगेट येथील शिवाजी महाराज व टिळक पुतळा येथे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नातिक चौक-चिटणीस पार्क मार्गे देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘संविधान बचाओ-भारत बचाओ’, अशा प्रकारे घोषणांनी परिसर दुमदुमला होता.रॅलीमध्ये विकास ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव अतुल कोटेचा,उमाकांत अग्निहोत्री, प्रवक्ते अतुल लोढे, विशाल मुत्तेमवार, अॅड.अभिजित वंजारी, गिरीश पांडव, बंटी शेळके, रिचा जैन, डॉ.गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे,अल्पसंख्यांक अध्यक्ष इर्शाद अली, वासुदेव ढोके,नगरसेवक संजय महाकाळकर, नितीन साठवणे, रमेश पुणेकर,संदीप सहारे,भावना लोणारे, प्रशांत धवड, आशा उईके, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक,सेवादल अध्यक्ष प्रवीण आगरे,रामगोविंद खोब्रागडे सहित प्रदेश व शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारास धक्का पोहचला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन विकास ठाकरे यांनी यावेळी केले. २८ डिसेंबर १९८५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशात सर्वधर्मसमभाव व कोणत्या स्वरुपाचा प्रांतवाद वा जातीयवाद न आणता राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे सूत्र स्वीकारण्यात आले होते. त्यावर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. महात्मा गांधी यांच्या अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानानुसार देश चालायला हवा. परंतु केंद्रातील भाजप सरकार जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा 'फ्लॅगमार्च'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 8:33 PM
केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला.
ठळक मुद्देकाँग्रेसचा १३५ वा स्थापना दिन उत्साहात : ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’च्या घोषणांनी परिसर दणाणला