राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:41 PM2018-03-12T13:41:13+5:302018-03-12T13:41:25+5:30

एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.

Congress's focus on the reserved constituency in the state | राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

googlenewsNext
ठळक मुद्दे भेटी देऊन आढाव्यासाठी नेमल्या उपसमित्या : दलित नेते, अधिकाऱ्यांना पक्षात आणणार

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.
काँग्रेसने पक्षापासून दुरावलेल्या दलित नेते व मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाºयांनाही पक्षात येण्यासाठी विनंती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता राखीव मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी ही उपसमिती पार पाडणार आहे. समिती जबाबदारी दिलेल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेईल. मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, उद्योगपती, व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा करील. मतदारसंघातील धर्मगुरू, अनुसूचित जाती समाजातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन काँग्रेसतर्फे अनुसूचित समाजासाठी केलेल्या व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देईल. समाजाचे मेळावे व शिबिर आयोजित केले जातील. मतदारसंघातील इतर समाजातील नेत्यांची माहिती गोळा केली जाईल. संबंधित मतदारसंघातील प्रभावी वक्त्यांची नावे गोळा करून ती प्रदेश काँग्रेसकडे कळविली जातील. याशिवाय अनुसूचित जाती समाजाचे स्थानिक व राज्य पातळीवरील प्रश्न समजून घेत त्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठविली जाईल.
राजकीय समीकरणांचा देणार अहवाल
ही उपसमिती राखीव मतदारसंघांचा दौरा करेल. तेथील प्रमुख नेत्यांशी चर्चा करेल. दलित समाजातील, संघटनेतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, नेते यांची भेट घेईल. निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात काय करणे आवश्यक आहे, याची माहिती घेईल. सद्यस्थितीत या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी आहेत, ती पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा एकूणच अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.
अशी आहे नागपूर विभागीय उपसमिती
नागपूर विभागातील उमरेड, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघांवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आलेल्या विभागीय उपसमितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले किशोर गजभिये, कृष्णकुमार शेंडे, बंडूभाऊ सावरबांधे, शकुर नागाणी, सुरेश भोयर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने ८ मार्चपासून दौरे सुरू केले आहेत. सोमवार, १२ मार्च रोजी ही समिती नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनात येत आहे.

Web Title: Congress's focus on the reserved constituency in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.