नागपूर : काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत १६ ही जागेवर उमेदवारी देण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेनेच्या मतांची टक्केवारी लक्षात घेता करंभाड व बोथिया पालोरा या दोन जागेवर दावा केला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस जिंकली असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढली तर काँग्रेसला फटका बसू शकतो.
२००७, २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेने ७ ते ८ सदस्य निवडून आणित सत्तेत वाटा मिळविला होता. शिवसेना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले वर्चस्व जिल्ह्यात कायम ठेवत होती; पण २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पडली. शिवसेनेचा एकच सदस्य निवडून आला. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काही ठिकाणी आघाडी करून लढली होती; पण शिवसेना स्वबळावर लढली. काही जागेवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती.
राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर जिल्हा परिषदेतही असाच प्रयोग झाला; पण सत्तेत सेनेच्या सदस्याला कुठलेही महत्त्व दिले गेले नाही. तसे तर काँग्रेसने राष्ट्रवादीच्या वाट्यालाही फारसं लागू दिले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात राष्ट्रवादी भूमिका सत्तेशी सकारात्मक दिसली नाही.
११ पैकी ७ जागांवर सेना लढली होती
- सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे ७, राष्ट्रवादीचे ४, भाजपाचे ४ व शेकापचा १ सदस्य आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रद्द झालेल्या ७ पैकी ५ सदस्यांच्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. तर राष्ट्रवादीच्या ४ पैकी २ सदस्यांच्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. शिवसेनेच्या मतांचीही टक्केवारी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे स्वबळाच्या नारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.
- शिवसैनिक झाले अॅक्टीव्ह
२०१९ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत शिवसेनेला मोठा फटका बसला. जिल्ह्यात शिवसेना संपली अशीच अवस्था झाली होती; पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची कमान सांभाळल्यानंतर शिवसैनिक अॅक्टीव्ह झाले आहेत. जिल्ह्याचे स्थानिक नेते आशिष जैस्वाल पुन्हा सेनेत परतले आहेत. शिवसेनेने जिल्ह्यात नवीन रचनाही केली आहे. जिल्हा परिषदेत नामुष्की टाळण्यासाठी किमान २ जागा निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना महाविकास आघाडीत असली तरी काहीच स्थान नाही. त्यामुळे सेनेला आपले अस्तित्व दाखविण्याची संधी आहे.