काँग्रेसच्या दोन जि.प. सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 12:45 AM2021-03-06T00:45:13+5:302021-03-06T00:46:45+5:30
Congress's two Z.P. members disqualify जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सर्कलमधून निवडून आलेले देवानंद कोहळे व प्रीतम कवरे या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. दोन्ही सदस्य काँग्रेस पक्षाचे असून, त्यांनी दिलेल्या मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सर्कलमधून निवडून आलेले देवानंद कोहळे व प्रीतम कवरे या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. दोन्ही सदस्य काँग्रेस पक्षाचे असून, त्यांनी दिलेल्या मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे पत्र १५ फेब्रुवारी २०२१ रोजी उपायुक्त (आस्थापना) अंकुश केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
गोवारी समाज आदिवासी नसल्याचा निर्वाळा देत त्यांना अनुसूचित जमातीचे लाभ देण्याबाबतचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला. या निर्णयामुळे गोवारी समाजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. याच निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे गोंडखैरी सर्कलचे सदस्य देवानंद कोहळे व जलालखेडा सर्कलचे प्रीतम कवरे यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत सादर करता आले नाही. नियमानुसार निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत विजयी उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, सहा महिने संपल्यानंतरही दोन्ही सदस्य वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी, असे उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.