नागपूर : हनी ट्रॅपच्या माध्यमातून डॉक्टर-उद्योजकांसह अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठग अजित पारसे याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पारसेच्या अटकेने हनी ट्रॅप आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पारसेविरोधात गुन्हा दाखल झाला होता व त्यानंतर सहा महिन्यांनी त्याला अटक करण्यात आली आहे.
भेंडे ले आऊट येथील महर्षी मृणाल अपार्टमेंट येथील रहिवासी असेला अजित गुणवंत पारसे हा स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ज्ञ होता. त्याने थेट ‘पीएमओ’त ओळखी असल्याचे सांगत ‘सीएसआर’ निधी मिळवून देण्याच्या नावाखाली महाल येथील डॉ.राजेश मुरकुटे यांना साडेचार कोटींहून अधिकचा गंडा घातला. त्याने यासाठी बोगस ई-मेल्सदेखील केले व हायप्रोफाईल व्यक्तींचे नाव सांगत धमकीदेखील दिली. यानंतर डॉ.मुरकुटे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात पारसे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बनावट लेटरहेड, स्टॅम्प पेपर, पोलिसांचे रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले.
अटक टाळण्यासाठी पारसे रुग्णालयात दाखल झाला. तसेच त्याने आत्महत्या करण्याचे नाटकदेखील केले. तो विविध माध्यमांतून हिंसक होत चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव टाकू लागला. दरम्यान, ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक वझलवार यांचीदेखील सीएसआर फंडाच्या नावाखाली फसवणूक केल्याची बाब समोर आली. तसेच मेट्रो आणि बेरोजगारांची फसवणूक केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. कथित आजारातून बरे झाल्यानंतर पारसेने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. नुकताच न्यायालयाने पारसेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याला अटक होणार असे मानले जात होते. अखेर गुन्हे शाखेने त्याला अटक करून ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक मोठी नावे समोर येऊ शकतात.
तक्रारदारच समोर आले नाहीत
पारसेविरोधात आतापर्यंत केवळ दोनच तक्रारदार समोर आले आहेत. त्याने शहरातील अनेक मोठ्या लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रारदार समोर आले नाहीत. पारसेने वैद्यकीय कारण देत बरेच आठवडे चौकशी टाळली होती.