निशांत वानखेडे
नागपूर : पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांकडून वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे मुंडके, कातडे (ट्राॅफीज) राजवाड्याच्या भिंतीवर लटकावून ठेवण्याची क्रेझ हाेती. वन कायद्यामुळे शिकारीवर बंदी आणली; पण या जुन्या ट्राॅफीज आजही लाेकांच्या घरी आहेत. आता त्या खराब हाेत चालल्या आहेत. यातले बहुतेक प्राणी दुर्मीळ किंवा लुप्तप्राय झाले आहेत. राज्याच्या वनविभागाने त्यासाठी पुढाकार घेतला. सध्या नागपुरात दुर्मीळ वाघ व बायसनच्या ट्राॅफीजचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनाचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र वनविभागाने सुरू केलेला देशातील हा पहिला प्रयाेग आहे. वन विभाग आणि हेरिटेज कंझर्व्हेशन सोसायटीतर्फे संयुक्तपणे हा प्रयाेग राबविला जात आहे. सेमीनरी हिल्स येथील प्रयाेगशाळेत वाघ आणि बायसनच्या ट्राॅफीज संरक्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रयाेगशाळेच्या संचालिका लीना झिलपे-हाते यांनी संवर्धनाच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली. या ट्राॅफीज अनेक वर्षे जुन्या असल्याने धूलीकण, फंगस, सूक्ष्म जीवाणू, आदी कारणांमुळे खराब हाेत चालल्या आहेत. त्या आणल्यानंतर आधी त्यांना १५ दिवस प्लास्टिकमध्ये विलगीकरणात ठेवले जाते. त्यानंतर त्यांना बाहेर काढून डिजिटल फाेटाेग्राफीसह त्यांचा आकार, डायमेन्शन, त्यातील समस्या, आदींचे डाक्यूमेंटेशन केले जाते. त्यानंतर मेकॅनिकल व फिजिकल स्वच्छतेला सुरुवात हाेते. अनेकदा धूलीकण व सूक्ष्म जीवाणूंच्या हल्ल्यामुळे केस गळती, कातडी क्रॅक हाेणे, आदी समस्या निर्माण हाेतात. रसायन वापरून ते स्वच्छ केले जाऊ शकते; पण सध्या आम्ही ते टाळत असल्याचे लीना हाते यांनी सांगितले. समस्या कळल्यानंतर मानवी उपचाराप्रमाणे ट्राॅफीजवर उपचार करून त्यांना सुस्थितीत ठेवले जाते. त्यामुळे या ट्राॅफीज चिरकाल टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यभरात ५००० ट्राॅफीजची नाेंद
राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण अनुसंधान शाळा (लखनऊ)चे माजी महासंचालक व हेरिटेज कंझर्व्हेशनचे मार्गदर्शक डॉ. बी. व्ही. खरबडे यांनी सांगितले की, जुने राजेरजवाडे व उद्याेगपतींकडे वन्यप्राण्यांच्या ट्राॅफीज ठेवल्या आहेत. अशा ट्राॅफीज ठेवणाऱ्यांना मालकी प्रमाणपत्रही देण्यात आले. त्याचप्रमाणे वनविभागाच्या राज्यभरातील कार्यालयांमध्ये ४०-५० वर्षे जुन्या ट्राॅफीज आहेत. अशा ५००० ट्राॅफीजची नाेंदणी झाली आहे. नुकतेच राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांनी प्रयाेगशाळेला भेट दिली आणि त्या ट्राॅफीजही नागपुरात आणण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. असे झाले तर नागपुरात हजाराे ट्राॅफीजचे संग्रहालय हाेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वारशांचे संवर्धन आवश्यक
संस्कृतीशी संबंधित कलाकृती, पांडुलिपी, दस्तावेज आणि ट्रॉफीज, आदी वस्तू आपला वारसा आहेत. पुढच्या पिढीसाठी त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मध्यवर्ती संग्रहालयात पांढरा कावळा ठेवला असल्याने त्याचे अस्तित्व जाणता येते. वन विभागाच्या या पुढाकाराने अशा माैल्यवान वस्तूंच्या संवर्धनाचे काम हाेत आहे.
- लीना झिलपे-हाते, संचालिका, हेरिटेज कंझर्व्हेशन सोसायटी
हा वाघ आकाराने माेठा
सध्या प्रयाेगशाळेत असलेला वाघ आकाराने माेठा आहे. हे या वाघाचे वैशिष्ट्य आहे. कालांतराने वाघाचा आकार कमी कमी हाेत ताे आजच्या आकारात दिसून येत असल्याचे लीना हाते यांनी सांगितले.