लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅनडा, ब्राझीमध्ये वाहनांमध्ये फ्लेक्स इंजिनचा वापर केला जातो. या इंजिनमध्ये एकतर १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल भरून वाहन चालविता येते. हेच तंत्रज्ञान भारतातील वाहनांसाठी वापरण्यात येत असून पुढच्या तीन -चार महिन्यात सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वाहनांमध्ये फ्लेक्स इंजिन वापरणे अनिवार्य करण्या संदर्भातील धोरणावर मंत्रालयाद्वारे विचार सुरु आहे , असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. विहिरगाव येथे बैद्यनाथ ग्रूपतर्फे स्थापित बी एलएनजी या देशातील पहिल्या इंधन पंपाचे उद्घाटन गडकरी यांनी रविवारी केले. त्यावेळी ते बोलत होते.
पेट्रोल डिझेलच्या किमती पाहता जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून आंदोलनेही होत आहेत. पेट्रोल डिझेलमुळे अधिक प्रदूषणाचा सामना देशातील शहरांना करावा लागत आहे. डिझेल पेट्रोलची आयात हे देशासमोर मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत त्यांना पर्याय म्हणून एलएनजी व सीएनजी हे वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात. हेच भविष्यातील इंधन बनेल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
अनेक देशांमध्ये एलएनजीवर ट्रक, बस, कार यशस्वीपणे चालत असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे आपल्यालाही क्रूड तेलाची निर्यात रोखण्यासाठी पर्यायी इंधन म्हणून एलएनजी वापरणे आवश्यक आहे. जैविक इंधनाची अर्थव्यवस्था अधिक मोठी करण्यासाठी कृषी क्षेत्राला जैविक इंधन निर्मितीकडे वळविणे आवश्यक आहे. आतापर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जात होते, परंतु आता हे प्रमाण २२ टक्के करण्याची परवानगी शासनाने दिली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
देशात हायड्रोजन फ्यूएल सेलवरही काम सुरु आहे. युके आणि चीन येथे मोठ्या संख्येने इथेनॉल व एलएनजीवर वाहने चालत आहेत. ट्रक वाहतूकदारांनी आपले डिझेलचे इंजिन एलएनजी व सीएनजीवर रुपांतरित करावे. तसेच बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांनीही बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी व अन्य वाहने सीएनजीवर रुपांतरित करावी असे आवाहन त्यांनी केले.