लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : चौदामैल ते सावनेर महामार्गावर कंटेनरमधून संशयितरीत्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी सावनेर यांना मिळताच पोलिसांनी सापळा रचला. संशयित कंटेनरला थांबवून झडती घेतली असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी (८ जून) रात्री ९ वाजेच्या सुमारास बीपी पेट्रोल पंपजवळ करण्यात आली.
आरोपी वसीम खान, असे वाहनचालकाचे तर साहूद खान क्लीनरचे नाव आहे. कंटेनर ट्रक क्रमांक एचआर ४७/ डी १०४८ ने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सावनेर ते चौदामैल मार्गावर प्रतिबंधित सुगंधित पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेरला मिळाली. त्यांनी कंटेनरचा शोध घेऊन कारवाईबाबत आदेश दिले. तातडीने पोलिस हवालदार अतुल शेंडे व अशोक चौधरी यांना रवाना केले.
पेट्रोलिंगदरम्यान कंटेनर क्रमांक एचआर ४७/ डी १०४८ हा बी. पी. पेट्रोलपंपाजवळ संशयितरीत्या मिळून आला. त्यांनी कंटेनरचालक वसीम खानला विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. कंटेनरमधून पानमसाल्यासारखा वास येत असल्याने वाहन पोलिस ठाण्यात कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष पंचनामा तयार करून वाहनाचे सील तोडून प्लास्टिकच्या पोत्यांची पाहणी केली. यावेळी राज्यात प्रतिबंधित राजनिवास नावाचापानमसाला व जाफरानी जर्दा झेड एल ०१ या नावाचे लेबल असलेला तंबाखू मिळून आला.
सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन नागपूर यांना कारवाईबाबत माहिती देण्यात आली. ९ जूनला अन्न व सुरक्षा अधिकारी एस. व्ही. भामके यांनी पंचनामा केला. या कंटेनरमध्ये राजनिवास नावाचे लेवल असलेल्या पानमसाल्याची पाकिटे असलेली १७६ पोती एकूण वजन सहा हजार ७५८.४ किलोग्रॅम, किंमत ६७ लाख ५८ हजार ४०० रुपये व जाफरानी जर्दा झेडएल ०१ नावाचे लेबल असलेल्या तंबाखूची पाकिटे ३५ पोते एकूण वजन १८९० किलोग्रॅम, किंमत १८ लाख ९० हजार रुपये व कंटेनर क्रमांक एचआर ४७ डी / १०४८ किंमत ४० लाख रुपये, असा एकूण एक कोटी २६ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एस. व्ही. भामके यांच्या तक्रारीवरून वाहनचालक वसीम खान व क्लीनर साहूद खान, वाहनमालक, माल खेरदी करणारा विकणाऱ्यांविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगेश कमाले, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी काकडे, पोलिस हवालदार अतुल शेंडे, पोलिस नाईक अनिस शेख, पोलिस अंमलदार अशोक चौधरी यांच्या पथकाने केली.