- ऊर्वरित १२ हजारांना बसणार टाळेबंदीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटो हे मानवी दळणवळण व्यवस्थेचा कणा आहे आणि यावर मोठ्या संख्येने रोजगार आहे. गेल्या वर्षी इतर क्षेत्रातील रोजगारप्रमाणेच या क्षेत्रावरही टाळेबंदीमुळे विरजण पडले आणि अनेक ऑटोचालकांची आर्थिक स्थिती ढासळली होती. मधल्या काळात कोरोना शिथिल पडला आणि गाडी रस्त्यावर उतरायला लागत नाही तोच पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाने आपला विळखा घातला. पुन्हा एकदा कठोर टाळेबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सोबतच या काळात बेकार होणाऱ्यांना आर्थिक तजविजही देऊ केली आहे. यात ऑटोचालकांना दीड हजार रुपये मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे. परवानाधारकांना या मदतनिधीचा थोडा का होईना लाभ होईल. मात्र, जे भाड्याने ऑटो चालवितात त्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात साधारणत: ३२ हजार परवानाधारक व बॅचधारक ऑटाेचालक आहेत. यातील २० ऑटोचालकांजवळ ऑटोचा परवाना असून, उर्वरित १२ हजार ऑटोचालकांजवळ ऑटो असण्याचा परवाना नाही. यांच्याजवळ केवळ वाहन चालविण्याचा परवाना व बॅच आहे. अशास्थितीत राज्य शासनाकडून मिळणारे दीड हजार रुपयापासून हे १२ हजार ऑटोचालक वंचित होणार आहेत. त्यांच्याविषयी राज्य शासनाने विचार करावा, अशी मागणी ऑटोचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
------------------
* जिल्ह्यात ऑटोचालकांची संख्या
- ऑटोचा परवाना असलेले चालक : २० हजार
- भाड्याने ऑटो चालविणारे व बॅचधारक - १२ हजार
------------
किमान पाच हजार रुपये हवे
शासनाने टाळेबंदीची मदत जाहीर केली असली तरी ती फारच तुटपुंजी आहे. ऑटोचे इन्स्टॉलमेंटच तीन ते साडेतीन हजार रुपये आहे. अशास्थितीत ही मदत कितीशी कामी पडणार? शिवाय, ही मदत कशातऱ्हेने व कधी मिळणार, याबाबत स्पष्टीकरण नाही. ही मदत प्रादेशिक परिवहन विभागा(आरटीओ)च्या माध्यमातून दिली गेली तर ऑटोचालकांपर्यंत पोहोचेल. आरटीओकडे परवानाधारकांची यादी आहे व ऑटोचालकांचे पासबुक मागवून ही मदत वळती करणे सोपे जाईल. मात्र, जे ऑटोचालक भाड्याने ऑटो घेऊन ऑटो चालवितात, त्यांच्यासाठी कोणतीच योजना नाही, हे दु:खद आहे.
- चरणदास वानखेडे, अध्यक्ष : ऑटोचालक महासंघ
-----------------
* शासनाने उशिरा हा होईना, चांगला निर्णय घेतला. मात्र, ही मदत पोहोचण्यास उशीर होऊ नये. अन्यथा घोषणा व अंमलबजावणीत बरेच अंतर असते.
- कैलाश श्रीपतवार, ऑटोचालक
* गेल्या वर्षभरापासून एकेका पैशाची अडचण आहे. गाडी रुळावर पोहोचत असतानाच पुन्हा टाळेबंदी लावली गेली. यात मिळालेली ही मदत तुटपुंजीच म्हणावी. पण, नाहीपेक्षा बरीच आहे.
- मोहन बावणे, ऑटोचालक
* अनेकांनी इन्स्टॉलमेंटवर ऑटो खरेदी केले आहे. ते इन्स्टॉलमेंट या मदतनिधीतून भरता येणार नाही. मदतनिधी देणार, हे चांगले. पण, बँकेला या काळात इन्स्टॉलमेंट घेऊ नका, हे सांगणे गरजेचे होते.
- इजराईल खान, ऑटोचालक
....................