लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजाराच्या खाली आला, तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनकच असून ही संख्या लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
बुधवारी नागपूर जिल्ह्यात ४ हजार ३९९ रुग्ण आढळले. यातील २ हजार ५३४ रुग्ण नागपूर शहरातील, तर १ हजार ८५३ रुग्ण ग्रामीण भागातील होते. २४ तासात ७ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ४ हजार ६८२ रुग्ण शहरातील, तर २ हजार ७१८ रुग्ण ग्रामीण भागातील होते. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मृत्यूंची संख्या वाढली. ८२ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ४८, ग्रामीणमधील २२, तर जिल्ह्याबाहेरील १२ जणांचा समावेश होता.
बुधवारी सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी झाली. जिल्ह्यात एकूण ६६ हजार ११६ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३६ हजार ६४८ रुग्ण शहरातील, तर २९ हजार ४६८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ५३ हजार ३३९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर विविध रुग्णालयांमध्ये १२ हजार ७७७ रुग्ण दाखल आहेत.
२१ हजाराहून अधिक चाचण्या
२४ तासात २१ हजार ६१२ नमुन्यांची तपासणी झाली. यात शहरातील १५ हजार २९८, तर ग्रामीणमधील ६ हजार ३१४ नमुन्यांचा समावेश होता. आतापर्यंत जिल्ह्यात २३ लाख ७९ हजार ६१ नमुन्यांची तपासणी झाली आहे.
आतापर्यंतची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह - ४,३२,९३८
एकूण बरे झालेले रुग्ण - ३,५८,९९४
एकूण मृत्यू - ७,८२८
एकूण चाचण्या - २३,७९,०६१