कमलेश वानखेडे, नागपूरनागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एका प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर देशमुख यांनी भाजवर हल्लाबोल केला आहे. जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपच्या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे, असा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी जळगाव येथील तत्कालिन पोलीस अधिक्षकावर दबाव टाकल्याच्या आरोपाखाली सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तत्थ्यहीन असल्याचे देशमुख म्हणाले. महाराष्ट्रात फडणवीस यांच्याकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा आजी-माजी गृहमंत्र्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.