नागपूर : न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन राज्यातील २ लाख २२ हजार १३५ गरीब अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. येत्या ३० जुलैपर्यंत त्यांना अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लोक दहशतीत आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांचे छत हिसकावून त्यांना बेघर करण्याचा हा डाव असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात येत्या २० जुलै रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व वंचितचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
पंजाब राज्यातील गायरान जमिनीवरील आतिक्रमण बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर निर्णय देताना संपूर्ण देशात दहा लाख हेक्टरहून अधिक जमीन अतिक्रमणाखाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार राज्यातील सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आहे. नियमानुसार २० ते ३० वर्षांपासून वास्तव्याला असणाऱ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल केले जाते. अनेक शासन निर्णय व न्यायालयाचे आदेश याबाबत आहे. मात्र न्यायालयाचा आधार घेऊन ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांच्या डोक्यावरील छत काढले जात आहे.
राज्यातील अनेक गावांमध्ये नागरिक दहशतीत आहे. सध्या पहिल्या टप्प्यात नोटीस देण्यात आल्या आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात हा आकडा कितीतरी अधिक वाढेल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, शहराध्यक्ष रवी शेंडे आदी उपस्थित होते.