नागपूर : अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव करून त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे, असा थेट आरोप आज भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केला आहे.
वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीस आणि उद्योगस्नेही वातावरणास अडसर निर्माण करणाराच आहे असा गंभीर आरोपही जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गजभिये यांनी केला.
अविश्वासाने आणि जनादेश लाथाडून अभद्र आघाडीद्वारे गैरमार्गाने मिळविलेली सत्ता अडीच वर्षांत गमावल्याच्या संतापातून ठाकरे पितापुत्रांचा हा थयथयाट सुरू असून, याचा सूड महाराष्ट्रावर उगवण्यासाठी राज्यातील गुंतवणुकीत अडसर उभे करण्याचा भयंकर कट रचला जात आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. ठाकरे सरकारशी संबंधित असलेल्यांच्या भ्रष्टाचाराचे भयंकर नमुने आता उजेडात येऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या आणि देशद्रोह्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागलेल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी काही बोलभांड नेत्यांना गजाआड जाण्याच्या भीतीने घाम फुटला असून त्या भीतीपोटीच हे आकांडतांडव सुरू आहे, असा टोलाही जिल्हाध्यक्ष गजभिये यांनी लगावला