नागपूर : सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. ही बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. पिनाक दंदे यांचा विशेषत्वाने समावेश होतो, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी डॉ. दंदे फाउंडेशनच्या कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या धरमपेठ येथील नागरिक सहकारी रुग्णालयाच्या वास्तूत हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घारड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह मंचावर डॉ. पिनाक दंदे उपस्थित होते. गडकरी म्हणाले, सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली. दंदे हॉस्पिटललाही ७ व्हेंटिलेटर आणि ५ बायपॅप मशीन, २४ लाख रुपयांची रुग्णवाहिका भेट दिली. लवकरच हवेतून ऑक्सिजन काढणारे युनिटही उपलब्ध करून दिल्या जाईल. फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिक सहकारी रुग्णालयांमधून एक चांगला उपक्रम प्रत्यक्षात साकार होऊ शकला, असेही गडकरी म्हणाले. तिसरी लाट येणारच आहे, असे समजून आपण तयारी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सुनील केदार व घारड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. डॉ. परिणय फुके, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोरकुटे, प्रवीण महाजन, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. दंदे यांनी केले. तीन आठवड्यांत रुग्णालये उभे केल्याची माहिती देत रुग्णालयात ऑक्सिजनच्या ६० खाटा तर आयसीयूचा १५ खाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले, तर आभार डॉ. नृपाल दंदे यांनी मानले.