शरद यादव : आवाज इंडियाचा स्थापना दिवस उत्साहातनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे. परंतु वर्तमान सरकार हे संविधान बदलण्याचे कुटील षड्यंत्र रचत आहे. असे हजार प्रयत्न झाले तरी ते हाणून पाडू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात येऊ देणार नाही, असे प्रतिपादन जनता दल युनायटेडचे प्रमुख खा. शरद यादव यांनी केले. आवाज इंडिया टीव्ही चॅनलतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व चॅनलच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अरविंद सोनटक्के, पी.एस. खोब्रागडे, सुनील सरदार, गुणवंत देवपारे, राजीव झोड़पे, अमन कांबळे आणि आवाज इंडियाचे प्रीतम बुलकुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात भगवान बुद्धावर आधारित इंटरनॅशनल अल्बम ‘सम्बुद्धा’चे सादरीकरणही करण्यात आले. शरद यादव पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला नाकारून दलित, शोषित, पीड़ित लोकांच्या अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी संविधानाद्वारे माणुसकीची खरी व्याख्या समाजाला शिकवली. परंतु हे आपले दुर्दैव आहे की बाबासाहेबांचे विचार आम्ही अद्याप कृतीत उतरवू शकलो नाही. यावेळी शरद यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि शिक्षणावर आधारित ‘जय भीम’ या गीताच्या लेजर शोचे उद्घाटनही करण्यात आले. गायक संतोष पावा आणि स्पेनची गायिका मि लिली हिने ‘सम्बुद्धा’ अल्बमचे सादरीकरण केले. संचालन डॉ. राजेंद्र फुले यांनी केले. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे संविधान धोक्यात येऊ देणार नाही
By admin | Published: April 16, 2017 1:39 AM