लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन हा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतील.
केंद्रीय सचिवांनी यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे या संपूर्ण कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतील. त्याचवेळी देशातील सर्व केंद्रीय कार्यालयात संविधान वाचन होईल. त्याचवेळी सर्व नागरिकांनी संविधानाचे वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्र सरकारचे काय
संविधान दिनी २६ तारखेला शासन स्तरावर संविधानाचे वाचन व्हावे, अशी मागणी संविधान फाऊंडेशनतर्फे केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने याची दखल घेतली. स्वतः पंतप्रधान संविधान प्रास्ताविकेचे वाचन करणार आहेत, पण पुरोगामी विचारांचे राज्य असलेल्या महाराष्ट्र सरकारचे काय, संविधान दिनाचा कार्यक्रम काय, असा प्रश्न संविधान फाऊंडेशन चे अध्यक्ष इ. झेड. खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे.