न्या. भूषण गवई : विद्यापीठाच्या संविधान सप्ताहाचा समारोपनागपूर : स्वातंत्र्याच्या ६६ वर्षात भारतावर अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय संकटे आली. मात्र अशा सर्व परिस्थितीत हा देश एकसंघ राहिला तो केवळ आणि केवळ संविधानामुळेच. त्यामुळे जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत देशातील एकही नागरिक डॉ. बाबासाहेबांना विसरणार नाही. संविधान म्हणजे, बाबासाहेबांनी तयार केलेले जिवंत स्मारक होय, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित संविधान सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात न्या. भूषण गवई बोलत होते. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप उके, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. न्या. गवई म्हणाले, बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते, त्यानुसार परिवर्तन घडत आहे. या देशात महिलांना शुद्रांपेक्षाही कमी दर्जाचे लेखले जात होते. त्यांना आज पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले ते बाबासाहेब व त्यांनी दिलेल्या संविधानामुळे. संविधानात नमूद मार्गदर्शक तत्त्वे हे मूलभूत अधिकारांएवढेच महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये देशातील सर्व समस्यांचे उत्तर सापडते. सामाजिक, आर्थिक विषयांशी संबंधित लाखो खटले न्यायालयापुढे आले. मात्र मार्गदर्शक तत्त्वांमधील घटनाकारांचा आशय न्यायालयांना सुनावणीसाठी नेहमी मार्गदर्शक ठरतो. महिलांचे अधिकार, आरक्षण, वाईट प्रथा,कामगारांचे प्रश्न, किंवा दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या असो, या सर्वांच्या अधिकारांची सुरक्षा संविधानाने निश्चित केल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. दिलीप उके म्हणाले, देशातील अस्पृश्यता व जातीभेदामुळे बाबासाहेबांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्या सर्व वाईट चालिरीती त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक समता अद्याप प्रस्थापित झाली नाही. सामाजिक व आर्थिक समता स्थापित होईपर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही आणि संविधानाची उद्दिष्टे सफल होणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ प्रमोद येवले यांनी, संविधानाच्या रूपाने देशाचा पाया मजबूत असल्याने लोकशाही कोलमडली नाही, असे सांगत प्रामाणिक अंमलबजावणीने भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरण मेश्राम यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)