लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात संविधान प्रस्ताविका पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कसाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना या पार्कसाठी गठित करण्यात आलेल्या समितीला पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केल्या आहेत. या पार्कसाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव तयार करून समाजकल्याण विभागाकडे लगेच पाठविण्यात यावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.विद्यापीठात एक बैठक यासंदर्भात सोमवारी आयोजित करण्यात आली होती. डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात सध्या असलेला डॉ. आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा हा आता पूर्णाकृती बनविण्यात येणार आहे. या पार्कसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी गिरीश गांधी आहेत. तसेच आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रा. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, महापौर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किशोर रोही, रजिस्ट्रार पूरणचंद्र मेश्राम, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, संचालक डॉ. दिनेश अग्रवाल, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचा समावेश आहे.बैठकीला समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी, आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, प्र-कुलगुरू प्रमोद येवले, एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, पूरणचंद्र मेश्राम आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधान प्रस्ताविका पार्कची संकल्पना असून यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. आर्किटेक्ट कांबळे यांनी डिझाईन तयार केले आहे. विधी महाविद्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या ३-४ एकर जागेत हा पार्क तयार करण्यात येत आहे. भारतात प्रथमच असा पार्क साकारला जाणार आहे.सर्वसामान्यपणे राज्यघटना फक्त पुस्तकातूनच माहिती आहे. या पार्कमध्ये राज्यघटनेतील काही मूल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. त्यात संसदेची प्रतिकृती, सर्वोच्च न्यायालयाची प्रतिकृती, संविधानाची प्रत अशा काही कलाकृतींचा समावेश आहे.