ऑनलाईन लोकमतनागपूर : अतिउजव्या विचारधारेमुळे राज्यघटना धोक्यात आली आहे. वर्तमान केंद्र सरकारने सध्या राज्यघटनेशी खेळ चालविला आहे. न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली.
अखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी फेडरेशनचे आठवे द्विवार्षिक अधिवेशन १७ आणि १८ ऑगस्टला खामला व्यंकटेशनगर येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम, बीओएमओएचे सरचिटणीस राजीव ताम्हणे, एआयबीओएमईएफचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर, रिसेप्शन समितीचे चेअरमन बीएनजे शर्मा, महासचिव स्वयंप्रकाश तिवारी उपस्थित होते. अधिवेशन स्थळाला ए.बी. बर्धन यांचे नाव देण्यात आले आहे.
गणेश देवी म्हणाले, देशातील घटनात्मक संस्था सरकारला शरण गेल्या आहेत. घटनेतील ३७० सारखे महत्त्वपूर्ण कलम सरकारने चुटकीसरशी रद्द केले आहे. माणसाच्या आयुष्यात स्वप्नांना महत्त्वाचे स्थान आहे. पण, गेल्या काही वर्षांत स्वप्ने दाखवली आणि विकली जात आहे. सरकार दाखवेल त्या स्वप्नांचा स्वीकार करणे बंधनकारक होऊ लागले आहे. आपल्या विचारधारांनी भारतच नव्हे संपूर्ण विश्व पोखरून काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.बँक राष्ट्रीयीकरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अधिवेशन भरविण्यात आले आहे. अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी निगडित वाढते कर्ज आणि त्याविरोधात एआयबीईएने उघडलेल्या मोहिमेवर चर्चा करण्यात येणार आहे. नोकरभरती, वेतनवाढ, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा नियमित कर्मचारी म्हणून समावेश, या प्रश्नांवर ठराव पारित करण्यासह संघटनात्मक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. अधिवेशनात १० संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.