नागपूर : राज्य सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोळ करण्यासाठी १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’ वाटपाची घोषणा केली. दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली असताना अद्याप लाभार्थ्यांना शिधेची थैलीच मिळाली नाही. पुरवठादाराकडून साहित्याचा पुरवठाच झाला नसल्याने शिधेची थैली वाटण्यात बाधा येत आहे. यामुळे गरिबांचा हिरमोड होत असून दिवाळी गोळ करण्याचा सरकारचा दावा फसल्याचे चित्र आहे.
अंत्योदय व केशरी कार्डधारकांना १०० रुपयांत प्रत्येकी १ किलो रवा, साखर, चना डाळ आणि १ लिटर पामतेल मिळणार आहे. नागपूर ग्रामीण भागात ४ लाख ११ हजार लाभार्थी आहेत. तर नागपूर शहरात ३ लाख ८५ हजार लाभार्थी आहेत. चार साहित्यापैकी काही साहित्याचा शंभर टक्के पुरवठा झाला. परंतु काही साहित्याचा ४०-६० टक्केच पुरवठा झाला. चारही साहित्य एक थैलीत टाकून द्यायचे आहे. सर्वच साहित्य नसल्याने लाभार्थ्यांना ते देण्यास रेशन दुकानदारांची अडचण होत आहे. तर दुसरीकडे दिवाळी गोळ करण्यासाठी लाभार्थ्यांना रोज चकरा माराव्या लागत आहे. परंतु त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यात ४० हजाराच्या घरातच लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याचे सध्या तरी दिसून येते.
तीनवेळा करावे लागते ‘थम’
पॉस मशीनमध्ये सॉफ्टवेअर लोड करण्यात आले आहे. पूर्वी लाभार्थ्यांना धान्यासाठी एकदाच थम करावा लागत होता. परंतु आता मोफत व विकतच्या धान्यासाठी दोनदा थम करावे लागते. त्यातच आनंदाचा शिधा मिळविण्यासाठी तिसऱ्यांदा थम लावावा लागत आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला तीनवेळा थम करावे लागत असल्याने धान्य मिळण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे.