आॅनलाईन लोकमतनागपूर : आदिवासी विभागाच्या आश्रम शाळा, वसतिगृह यांच्या बांधकामांना गती मिळावी याकरिता आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम कक्ष सुरू करण्यात आला आहे, त्या माध्यमातून या कामांना पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे, निधीची कुठलीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.सदस्य सुरेश लाड यांनी कर्जत व पेण तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळांच्या समस्यांबाबत प्रश्न विचारला होता. या संदर्भात उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री सवरा म्हणाले की, कळंब ता. कर्जत येथील शाळा ही पेण प्रकल्पांतर्गत असून ही शाळा भाड्याच्या इमारतीत असल्याने तसेच या शाळेत विद्यार्थी संख्या कमी असल्याने ती नजीकच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील अन्य चार आश्रम शाळांमध्ये कळंब येथील शाळेतील ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भारती लव्हेकर, पांडुरंग बरेरा यांनी भाग घेतला.