लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख घातक असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने ही राख बेंगळुरूला पाठविण्यासाठी मालगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार ७८०० टन राख ११६ वॅगनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. या राखेचा वापर बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या ब्रिक्ससाठी करण्यात येणार आहे.
राज्यातील १६ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून वर्षाकाठी हजारो टन कोळशाची राख तयार होते. राखेमुळे प्रदूषण वाढते. ही राख नद्यांमध्ये किंवा जमिनीवर टाकली जाते. जमिनीवर टाकलेली राख हवेत उडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर उपाय ही राख इमारतीच्या बांधकामात वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मध्य रेल्वे नागपूर विभागातील वरोरा येथील औष्णिक वीज केंद्रातून निघालेली कोळशाची राख अॅश टॅक कंपनीने नाममात्र दरात खरेदी करून पहिल्यांदाच मालगाडीने पाठविण्यात आली. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनात मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्यासह वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या राखेपासून विटा बनवण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथे आहे. यामुळे रोजगारही उपलब्ध होतो.