लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : माैदा तालुक्यातील वायगाव-पांढराबाेडी मार्ग नागपूर व भंडारा जिल्ह्याला जाेडणारा आहे. या मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलाचे बांधकाम दाेन वर्षापासून रखडले आहे. याला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आराेप स्थानिक लाेकप्रतिनिधींनी केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वायगाव-पांढराबाेडी हा परिसर नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. येथून नागपूरच्या तुलनेत भंडारा शहर जवळ असून, येथील बहुतांश शेतकरी व नागरिक त्यांच्या बहुतांश कामासाठी नागपूरऐवजी भंडारा शहर व जिल्ह्यातील आंधळगाव, मोहाडी व तुमसर येथील बाजारपेठेत शेतमालाची विक्री व इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी जातात. या भागातील बहुतांश विद्यार्थी भंडाऱ्याला शिक्षण घेत असून, आराेग्यसेवेसाठीही भंडाऱ्यालाच जातात. त्यासाठी ते याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर वायगाव व पांढराबाेडी दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली.
या पुलाचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे म्हणून वायगाव-शिरसोली गटग्रामपंचायतने ठराव पारित केले असून, ठराव व नागरिकांची निवेदने अनेकदा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिली. परंतु, काहीही उपयाेग झाला नाही, असा आराेपही नागरिकांनी केला आहे. परिणामी, या प्रकरणाची चाैकशी करून त्यात दाेषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी पांढराबोडीचे सरपंच विनोद वैद्य, डॉ. मनोज गायधने, खुशाल धुमनखेडे, जगदीश राखडे, हिंमतकुमार राखडे, जगन्नाथ गायधने, राजेश राकडे, तुळशीदास मारवाडे, सूर्यभान शेंडे, तुळशीराम शेंडे, अमित राखडे, संदीप राखडे, विष्णू शेंडे, बाबूराव धुमनखेडे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
१ काेटी २७ लाख रुपये मंजूर
या पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने सन २०१९ मध्ये १ काेटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. शिवाय, पूल बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील चौधरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. कंत्राटदार कंपनीने दाेन वर्षापासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवातच केली नाही. त्यामुळे वायगाव, पांढराबाेडी परिसरातील शेतकरी व नागरिकांना भंडारा जिल्ह्यात ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.