नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी बांधकाम सुरू असलेल्या ओव्हरपासचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकल्प राबविणाऱ्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या संपूर्ण घटनेचा ठपका मेघा कन्स्ट्रक्शन या एजन्सीवर ठेवला आहे. मात्र हा सर्व प्रकार होत असताना समृद्धी महामार्गाची जबाबदारी असलेल्या ‘एमएसआरडीसी’चे अधिकारी यावेळी काय करत होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उल्लेखनीय आहे की, २ मे रोजी नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार या २१० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे उद्घाटन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र रविवारी रात्री उशिरा शिवमडका येथील महामार्गाच्या एंट्री पॉइंटपासून १५ किमी अंतरावर वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या ओव्हरपासचा काही भाग कोसळला. यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला.
दरम्यान, निविदा अटींनुसार यासाठी काम करणारी एजन्सी जबाबदार असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. प्राथमिक तपासातही हेच तथ्य समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. दुसरीकडे ‘एमएसआरडीसी’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघाताबाबत मौन बाळगले आहे.
कुणाचाही मृत्यू नाही
या अपघातात कोणत्याही कामगाराचा मृत्यू झाला नसल्याचा दावा अनिलकुमार गायकवाड यांनी केला आहे. मेघा कन्स्ट्रक्शन तसेच ‘एमएसआरडीसी’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनीदेखील अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. कोणी जखमी झाल्याचाही त्यांनी इन्कार केला आहे.
‘ओव्हरपास’च्या डिझाइनमध्ये बदल
दुर्घटनेनंतर वन्यजीवांसाठी बनवण्यात येणाऱ्या या ‘ओव्हरपास’च्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे. आता त्याचे डिझाइन ‘आर्क’सारखे राहणार नाही. स्टील गार्डसह नवी रचना तयार केली जाईल. वन्यप्राण्यांना सहज जाता यावे यासाठी वर माती टाकून झाडे लावली जाणार आहेत. ४५ दिवसांत ही रचना तयार होईल, असा दावा करण्यात येत आहे.
काँक्रीट टाकताना अपघात
कमानीवर काँक्रीट टाकताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या कमानीमध्ये एकूण १०५ पट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. एका पट्टीवर एकूण १०८ ब्लॉक होते तर ‘आर्क ब्लॉक्स’ची एकूण संख्या ३३ होती. यातील एका ब्लॉकवर सिमेंट टाकताना हा अपघात झाला.