लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपुरातील प्रभागमधील विठ्ठल नगर या भागात नासुप्रने ३०-३५ वर्षांपूर्वी टाकलेल्या जुन्या मुख्य गडर लाईनवर फ्लॅट स्किमचे बांधकाम सुरू आहे. यामुळे गडर लाईन बाधित होण्याचा धोका असल्याने परिसरातील वस्त्यांतील गडर लाईन तुंबण्याचा धोका आहे. गडर लाईनवर फ्लॅट स्कीम बांधकामाला नगररचना विभागाने मंजुरी कशी दिली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रभाग ३४ मधील विठ्ठलनगर, भोले बाबानगर, सरस्वती नगर , अमर नगर व अन्य वस्त्यांतील सिवरेज वाहून जाण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी नासुप्रने ही मुख्य गडर लाईन टाकली आहे. त्यावरच बांधकाम सुरू असल्याने गडर लाईन नादुरुस्त झाली आहे. शहरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भात असताना परिसरात नागरिक गडर लाईन फुटल्याने सर्वत्र घाण पाणी साचले आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात हनुमान नगर झोनचे कार्यकारी अभियंता, मनपाचे मुख्य अभियंता यांच्याकडे मागील काही दिवसांपूर्वी तक्रार केली; परंतु कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात झोनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित बिल्डरला नोटीस बजावली आहे. गडर लाईन बाधित करू नये असे सांगण्यात आल्याची माहिती दिली.
.....
परवानगी कशी दिली?
नासुप्रने ३०-३५ वर्षांपूर्वी टाकलेल्या जुन्या मुख्य गडर लाईनवर फ्लॅट स्किम उभारण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाने मंजुरी कशी दिली, नकाशा मंजुर करताना गडर लाईन असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले नाही का, स्पॉट व्हेरिफिकेशन केले नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
....
नगरसेवकांच्या तक्रारीची दखल नाही
गडर लाईनवर फ्लॅट स्कीमचे बांधकाम सुरू केल्याने गडर लाईन नादुरुस्त झाली आहे. या संदर्भात झोनचे कार्यकारी अभियंता, मनपाचे मुख्य अधियंता यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या; परंतु अद्याप कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली नाही. गडर लाईन बंद पडण्याचा धोका असल्याने काम थांबविण्यात यावे, अशी मागणी प्रभागाच्या नगरसेविका माधुरी ठाकरे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
....
गडर लाईन शिष्ट करणार
भूखंडाचे आरएल घेतल्यानंतर बांधकामाची मंजुरी घेतली; परंतु त्यावेळी गडर लाईन असल्याचे निदर्शनास आले नाही. नासुप्रने टाकलेली ही गडर लाईन ३० ते ४० वर्षांपूर्वीची आहे. गडर लाईन शिप्ट करण्याचे काम स्वत: करणार असल्याची माहिती बिल्डर पंकज धवन यांनी दिली.