लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महामार्ग बांधकामात जागतिक विक्रम केला आहे. मार्च २०२१ च्या अखेरपर्यंत महामार्ग मंत्रालयाने एका दिवसात ३७ किमी या गतीने महामार्ग बांधकाम केले आहे. जगात सर्वाधिक गतीने महामार्गाचे बांधकाम करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत देशभरात राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या सात वर्षांत राष्ट्रीय महामार्गाची लांबी ५० टक्क्याने वाढली आहे.
२०१४ मध्ये ९१,२८७ किमीवरून १ लाख ३७ हजार ६२५ किमीपर्यंत महामार्गाची लांबी गेली आहे. आर्थिक वर्ष २०१५ मध्ये ३३ हजार ४१४ कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीतही वाढ होऊन ती आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १ लाख ८३ हजार १०१ कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे.
लवकरच एका दिवसात ४० किमीने पुढे जाऊ
महामार्ग मंत्रालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ही यशस्वी कथा रचली गेली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सन २०१४ नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण त्यावर उपाययोजना करून या विभागातील अधिकाऱ्यांनी हे काम केले. आमची क्षमता खूप आहे. फक्त लक्ष्य मोठे हवे. बांधकामाचा दर्जा उत्तम आणि खर्चात बचत कशी होईल, हेच आम्ही केले. लवकरच एका दिवसाला ४० किमी या गतीच्या पुढे आम्ही जाऊ, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.