लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात २८ विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्राचा लाभ घेता येणार आहे. ५२० प्रकारचे साहित्य या केंद्रात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने पुरविले आहे.यासाठी जिल्ह्यातील ७२ शाळांची प्रस्ताव आले होते. यातील ज्या शाळांची पटसंख्या सर्वाधिक आहे. जिथे विद्युत पुरवठा व अतिरिक्त वर्गखोल्या आहेत, अशा २८ शाळांची यासाठी निवड करण्यात आली. १३ ब्लॉकमध्ये दोन अशाप्रकारे विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्राच्या संचालनाकरिता शाळेतील विज्ञान शिक्षकाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे.अत्याधुनिक विज्ञान केंद्रामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना संशोधनाचे धडे मिळत आहे. या केंद्रामध्ये २५ विज्ञान, २५ गणित, २५ अंतराळ संशोधनाचे साहित्य तसेच ५९ अभ्यासक्रमावर आधारित व इतर माहितीचे १० प्रकारचे साहित्य संशोधनासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने असे जवळपास ५२० साहित्य विज्ञान केंद्रात उपलब्ध करून दिले आहे. सत्राच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थी या विज्ञान केंद्राचा उपयोग करीत आहे.
केंद्राच्या उपयुक्ततेसंदर्भात तपासणीया विज्ञान केंद्राचा उपयोग विद्यार्थी योग्य पद्धतीने घेत आहे की नाही, परिषदेने पुरविलेले साहित्य मिळालेले की नाही, भविष्यात हे विज्ञान केंद्र इतर विद्यार्थ्यांना कसे उपयुक्त होईल, यासाठी या सर्व केंद्राची तपासणी होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने पथक तयार केले आहे. यात डायटचे अधिव्याख्याता हे पथकाचे प्रमुख आहे. त्याचबरोबर सहायक कार्यक्रम अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुकास्तरावरील साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख व शासनमान्य प्रयोगशाळेचा प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.