- मेट्रो रेल्वे : ट्रॅकचे काम ८० टक्के पूर्ण
नागपूर : सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनदरम्यान (रिच-४) ट्रॅकचे काम आतापर्यंत ८० टक्के पूर्ण झाले असून हा मार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यानिमित्ताने मेट्रोने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
या दोन मेट्रो स्टेशनदरम्यान दोन्हीही मार्गावर एकूण १६.०५० किमी लांब ट्रॅक टाकण्यात येणार आहे. त्यापैकी १२.४९४ किमीचे काम पूर्ण झाले आहे. याचप्रमाणे व्हायाडक्ट, स्टेशन, ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई), सिग्नल आणि प्रकल्पांतर्गत इतर कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्यावर या मार्गावर मेट्रो रेल्वे धावायला लागेल. रिच-४ अंतर्गत इतवारी, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू आदी महत्त्वाचे व्यावसायिक भाग जोडले असून मेट्रो मार्गामुळे हे सर्व भाग शहराशी जोडले जाणार आहेत. याशिवाय नागपूर रेल्वे मुख्य स्थानक आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालादेखील जोडले जाते. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे संबंधित भागात राहणाऱ्यांकरिता अतिशय उपयुक्त ठरणार आहे.